डँबिस रिलेशन

      
 ''देणाऱ्यांनी देत जावे आणि घेणाऱ्यांनी घेत रहावे'' या म्हणीनुसार जगणारा आणि 'बहिणीला लुटणे' हा माझा जन्मसिध्द अधिकार मानणारा, माझा एकूलता एक भाऊ - प्रशांत      
      प्रशांतवर लिहायचं कारण असं की ''रक्षाबंधन'' हा दिवस बहीण - भाऊ नात्यासाठी खास असतो. बहीण भावाला राखी बांधते. भावाला समाधानी आयुष्य, मर्यादित संपत्ती लाभो म्हणून बहीण प्रार्थना करते आणि भाऊ बहीणीला गिफ्ट देतो. पण आमच्याकडे असं नाही बरं का. दोघांनी एकमेकांना गिफ्ट द्यायचे. म्हणजे कसं भाडणं नको. 
     इथे एक किस्सा शेअर करावासा वाटतो. रक्षाबंधनाच्या दिवशी आमची भाडणं झाली की ....
तो - तुला नाही एेकायचं ना माझं, चल मग माझं गिफ्ट परत दे.
मी - मग माझी राखी मला परत दे.
     मग आमच्या मातोश्रींनी यावर रामबाण उपाय शोधून काढला. रक्षाबंधन असो वा भाऊबीज दोघांनी एकमेकांना गिफ्ट द्यायचं म्हणजे भाडणं नको.
     बहीण - भावाच्या नात्यात जर भांडणं नसतील ते कसलं नातं. राजकीय लोकांसारखं दबाव टाकणं. आरोप - प्रत्यारोप करणं हे या डँबिस नात्यात आलंच. मला घरी यायला उशीर झाला तर मला कळू न देता माझी आईकडे चोकशी करणं. (कुठे फिरायला गेली का आपल्याला न सांगता असा संशय म्हणून पण ते उगाचच.)
          
           पण महाशयांना त्यांची शॉपिंग करायची असल्यास मीच सोबत हवी असते. त्याच्यासाठी शॉपिंगला गेल्यावर दुकानातील संवाद --
तो - हा घेऊ शर्ट घेऊ का? की हा ? कोणता कलर चांगलाय?
मी - नको...  हा अंकल टाइप आहे.त्यापेक्षा हा घे.
तो - गप तुला नाही कळंत
मी - बरंररर.... 
(शेवटी मी सांगितलेलाच शर्ट घेऊन दुकानाबाहेर पडतो)

    खाणं आणि त्याचा आस्वाद घेऊन खाणं ही त्याची पॅशन. आई घरी नसली की पूर्ण स्वंयपाकाची जबाबदारी माझ्याकडे असते. स्वयंपाक केल्यावर - 
मी - चांगली झाली का रे भाजी?
तो - हम्म..झालीये बरी...थोड मीठ हवं होतं.
मी - स्वत: करायची ना मग. 
तो - बघ चांगलं सांगितली की तुझं असं असतं.
मी - हम्मम्म
तो - ही अशी चपाती बनवतात का? ( विथ अॅक्शन) तुटत पण नाही...

  (शेवटी काय दाबून खातो)

    बहिणीच्या लग्नात मला तर वाटतं भाऊच जास्त रडतो. एरव्ही घरात लहान म्हणून मिरवणारा भाऊ बहिणीच्या लग्नाच्या दिवशी अचानक मॅच्युर्ड होतो. पाहुण्याचं स्वागत करणं, त्यांची विचारपूस करण्यामध्ये मग्न असला तरी त्याचं मन मात्र आपल्या बहिणीच्या अवतीभोवती फिरंत असतं. सध्या घरी माझ्या लग्नाचा विषय सुरु असतो. त्यावेळी त्याची प्रतिक्रीया......

माझ्या समोर लग्नाचा विषय सुरु असला की...
आई - अरे दीदीच्या लग्नाचं बघायला हवं..लगेच नाही करायचं पण आतापासून न्याहाळत रहायचं.
मी - मला नाही करायचं एवढ्या लवकर लग्न...मला अजून चांगला जॉब शोधायचा आहे.
पप्पा - बाई तु आईचं एेकू नको...लग्न काही अायुष्य नसतं..आयुष्याचा भाग असतो.
प्रशांत - काय एेकू नको...द्या करुन हिचं लग्न..म्हणजे कटकट कमी होईल.

मी नसताना लग्नाचा विषय सुरु असला की...
आई - अरे ती नाही म्हणतेय पण आपल्याला कुठे लगेच करायचंय. ती नाहीच म्हणार.
प्रशांत - अगं आई,  नाही करायचं तर कशाला जबरदस्ती करायची. तिला जेव्हा वाटेल तेव्हा करु. तिला करायचं आहे लग्न. तिला तिचा निर्णय घेऊ दे.

( थोडक्यात काय... उगाचच)

       आई नेहमी म्हणते तुम्हाला एक बहिण हवी होती. कधी गरजच पडली नाही म्हणा किंवा जाणीवही होत नाही. (आणि तसं पण अजून एक बहिण असती तर भावाच्या प्रेमाचा अर्धा हिस्सा द्यावा लागला असता.)   आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आम्ही एकमेकांना विचारुन निर्णय घेतो. (मग तो भांडणातून घेतलेला असू.) 
     मला तर असं कधी आठवंत नाही की आम्ही कधी एकमेकांशी प्रेमाने बोललोय. नेहमीच भाडणं मग मारामारी अालीच. एकमेकांच्या सिक्रेट गोष्टी उकरून काढायच्या. अगदी एकमेकांची आयुष्यभर नावं घेणार नाही अशी शपथ घेऊनच ही भांडणं संपवायची. ''आमची भाडणं झाली की आम्हाला जोडणारा सेतू म्हणजे आमची आई''. मग यानंतर आईचा रोल सुरु होतो. दोघांना समजून सांगते पण रागात काहीच पटंत नसतं. दोघंही आपापल्या निर्णयावर ठाम. 
           शेवटी तोच माघार घेऊन मुद्दाम मला बोलायला लावतो आणि त्याने दीदी अशी हाक मारली की माझा सगळा रागच निघून जातो. मग त्याच्यासोबत कधी बोलणं सुरु होतो आणि एकमेकांची कधी मस्करी करायला लागतो हे कळंतच नाही. 
   'तो जेव्हा दीदी म्हणून हाक मारतो तेव्हा कुणीतरी आईच अशी हाक मारतंय आणि आपण स्पेशल आहोत अशी जाणीव होते'. तो क्षण माझ्यासाठी आईपणाचा अनुभवच देणारा असतो. 
        असं म्हणतात की आई झाल्याशिवाय आईची किेंमत कळत नाही पण मला आई न होताच आईपणाची अनुभुती प्रशांतने दिली आहे.  त्यामुळे आपल्या दोघांमधील हा धागा टिकवून रहावा एवढीच अपेक्षा आहे. (याचा अर्थ असा नाही की मला गिफ्ट नकोय.) आयुष्यभर असाच माझा हक्काचा साथीदार म्हणून सोबत रहा. ''Thank you so much.My sweetheart being a part of my life'' 

                                                                                     - Pradnya K. Agale.



  

Comments

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग... पहिली स्टोरी...

"२६/११ कसाब आणि मी" - BOOK REVIEW