गावाकडच्या गोष्टी
गावाकडच्या गोष्टी म्हणटलं की आठवतं शेणाने सारावलेलं घर..मातीच्या भिंती..
चुलीवरचं जेवण.. रान... मोकळी हवा... वडाच्या पारावर बसून गावभरच्या केलेल्या गोष्टी... झेडपीची शाळा... मग कुठेतरी अलगद फुललेलं प्रेम... प्रेमापायी आणि दोस्तांच्यापायी
खाल्लेला घरच्यांचा मार. किती छान वाटतं ना हे सगळं ऐकायला.
पण सध्याच्या सोशल जगात आपण फक्त गावाकडच्या
गोष्टी फेसबूक, ट्विटर, वॉटस अपवर शेअर करतो. #चलागावाकडं असा हॅशटॅग देतो. आयुष्यंच
पोस्टवारीत निघून चाललंय. कधी तरी गावाकडे जायचं. गावच्या मंडळींसोबत शहराकडच्या
पोस्ट दाखवून फुशारक्या मारायच्या. एवढं सगळं करुन सोज्वळ टिप पण द्यायची बरं का, शेतीत
काय आहे? दिवसभर राब-राब राबा, पिकाला
पोटच्या पोरासारखं जपा, पाणी - खत, काय हवं नको ते सगळं बघायचं. पीक आलं
की बाजारात जाऊन विकायचं तिथे ही हेलपाठे. तिथेही ‘नाकापेक्षा हिरा जड’ अशी
अवस्था. शहर बरं. काम करा. महिन्याला
रोख रक्कम हातात. थोडा त्रास होतो, पण पैसे मिळतात की, याच
विचाराने आपण शहराची वाट धरतो. या नवख्या शहरात करिअर, आर्थिक प्रगतीच्या मागे
धावता - धावता माणुसकीलाही मुकतो. पण मानसिक समाधानापेक्षा पैसा मोठा. आजच्या सोशल
जगात ‘No matter satisfaction, only matter money’ ...
पण हे
सगळं मिळवूनही फ्रस्टेशन काढण्यासाठी विकेन्डला आपण निसर्गाकडेच तर पळ काढतो.
रखरखत्या शहराच्या उन्हात गावकडच्या ओलाव्याला Miss करत असतोच. पण जर तुम्ही सुध्दा
माझ्यासारखे गावाकडच्या गोष्टींना मुकत असाल किंवा
गावकडच्या गोष्टी Miss करत असाल किंवा
जगायचं राहून गेलं असेल तर Now Don't Worry.....
दिग्दर्शक नितीन पवारने यावरही एक solution काढलंय. ते ही एका क्लिकवर. तुम्हाला
फक्त तुमच्या अॅनरॉइड फोनमधील यु-ट्यूब वर एक serach करायचं आहे, ‘गावाकडच्या
गोष्टी’. तुमची - आमची आणि जगाची गरज बघता नितीने एक
वेबसिरीज सुरु केलीये. शहरी भाग तर घडामोडी घडण्याचं नाकाच. पण गावातही तेवढ्याच घडामोडी घडत असतात बरं का.. हेच मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न खोडकरपणाने केलाय.
सुरखी, संत्या, माधुरी, अव्या, बापू, बाब्या अशा काही या वेबसिरीजमधील
महत्वाच्या भूमिका. सुरखी ही विवाहीत पण तिचं पहिलं प्रेम तिच्या गावातलंच. गावचा
नवरा नको म्हणून तिचे वडील तिला मुंबईच्या मुलाशी लग्न लावून देतात.
जेमतेम
पगारामुळे सुरखीचा नवरा तीला गावीच ठेवतो आणि कधी सुरखी माहेरी आली की पहिलं प्रेम उफाळून येतंच. तिचं पहिलं
प्रेम म्हणजे संत्या... संत्या आणि सुरखी गावातील लव्ह बर्डच...
सुरखी-संत्या |
आता वळुया... माधुरी - अव्याकडे. अव्या
बेरोजगार इंजिनिअर... माधुरी बी-कॉम झालेली. अव्याने नोकरी करावी. चार पैसे कमवून ताठ
मानेने गावभर फिरावं, हप्त्यांवर का होईना फोरव्हिलरचा रुबाब आख्या गावात मिरवावा
अशी माधुरीची इच्छा असते.
माधुरी-अव्या |
अशी ही सगळी गावाकडची मंडळी प्रेक्षकाचं मन पहिल्या
ऐपिसोडमध्येच जिंकून घेतात. नितीनने हे गावातील छोटे-छोटे किस्से खूप रंजक रुपात
मांडले आहेत. दिग्दर्शकानं या शहरी माणसाला चांगलंच निरखून घेतलेलं आहे.
कोणालाही
उपदेश नको असतो..ना फुकटचा सल्ला.. अगदी सहज पात्रांच्या तोंडून निघालेले संवाद
मनात घर करातात. ('पावर
वावरात आहे शहरात नाही') शेती..गाव..आणि शहर या विषयाभोवती ही
पूर्ण वेबसिरीज फिरते. गावातील बारीक-सारीक गोष्टी यात पहायला मिळतात..
यात ना कोणी ड्रेस डिझायनर आहे ना कोणी मेकपवाली. निसर्गाला
जसा मेकअपची गरज नसते ना ड्रेस डिझायनरची. तो जसा असतो तसाच आपल्याला हवाहवासा
असतो. निसर्गाच्या सानिध्यात गेलो की आपण पक्क
ठरवतो की फक्त प्रेमात पडायचंय आणि सामावून घ्यायचंय, असंच काही या पात्रांनी
ठरवलेलं दिसून येतं. प्रेक्षकांना प्रेमात पाडायला कसूभरही कमी पडलेले नाहियेत.
अगदी
अल्प दिवसांत २ लाखांचा टप्पा पार करणारी ही वेबसिरीज महाराष्ट्राचंच नव्हे तर
परदेशी पाहुण्यांचीही मनं जिकंली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील लार्जेस्ट सिटी म्हणून
नावाजलेली जोहान्सबर्गनं आपल्या गावाकडच्या गोष्टींना थेट निमंत्रण दिलंय.
जोहान्सबर्ग, सा. आफ्रिका |
हे ऐकून,
एवढं काय आहे या वेबसिरीजमध्ये हा प्रश्न मला देखील पडला. ते जाऊ दे ओ... तुम्ही
विचार करा की संत्या
आणि सुरखीची लव्हस्टोरी पुन्हा फुलणार का? की प्रेम विसरायला भाग पाडणार? अव्या
माधुरीचं ऐकणार का? की शेतीत राबणार ? बापूचा 'अशीला अशी' हा फेमस डॉयलॉग तुमच्या चेहऱ्यावरही
हसू आणणार का? आता हे मी सांगणार नाही. सांगण्यात
मज्जा नाही जी बघण्यात आणि अनुभवण्यात आहे. हो ना !!! मग आता
बघाच..'गावाकडच्या
गोष्टी'
- Pradnya K. Agale.
Comments
Post a Comment